सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे विधी महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने “Youth for My Bharat and Youth for Digital Literacy” अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सावरगाव, नाशिक येथे २१ जानेवारी २०२५ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत यशस्वीपणे संपन्न झाले.
शिबिराची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमात एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. जान्हवी झांजे आणि प्रा. स्वप्नील पवार यांनी शिबिराचा अहवाल सादर करत शिबिराचे उद्दिष्ट आणि उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.
सात दिवसांचा कार्यकर्तृत्वपूर्ण अनुभव:
शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी ग्राम सर्वेक्षण केले, वृक्षारोपण केले, तसेच जुन्या झाडांना रंग देऊन त्यांची निगा राखली. गावात स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विविध तज्ञांच्या व्याख्यानांतून योगासन-तणावमुक्ती, लोकसंख्या नियंत्रण आणि सर्पदंश जनजागृती यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. श्रमदानाच्या माध्यमातून ज्ञान व सामाजिक जाणीव वाढवण्याचा उद्देश साध्य होताना दिसला.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती:
स्वयंसेवकांनी ग्रंथदिंडी, हरिपाठ, आणि अंधश्रद्धा निर्मूलन, लोकसंख्या नियंत्रण व डिजिटल साक्षरता यावर पथनाट्य सादर केले. या उपक्रमांनी गावकऱ्यांचे मनोरंजन करत प्रबोधनही केले.
समारोपाचा क्षण:
शिबिराच्या समारोप सोहळ्याला गावचे सरपंच श्री. लक्ष्मण बेंडकुळे, उपसरपंच श्री. रुंजा धोंगडे, म. वि. प्र. चे संचालक श्री. लक्ष्मण लांडगे, शिक्षणाधिकारी डॉ. विलासकुमार देशमुख, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या गडाख, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सरपंचांसह गावातील मान्यवरांनी एनएसएस स्वयंसेवकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
शिबिराच्या समाप्तीपूर्वी स्वयंसेवकांनी गावात स्वच्छता करून “स्वच्छतेचा संदेश” आपल्या कृतीतून दाखवला. या शिबिराने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजवली असून, ग्रामस्थांनी या सेवेचे मनःपूर्वक स्वागत केले.